नाशकात घातक शस्त्र विक्रेता अडकला पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : शहरातील गुन्हेगारी घटनांसाठी सातत्याने चर्चेत येत असलेल्या अंबड भागात मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात धारदार शस्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबड परिसरात सापळा रचत केलेल्या या कारवाईत १२ धारदार शस्त्र दुकानातून जप्त करण्यात आले आहे. शहरात शस्रांचा खुले आम वापर होत असल्याच्या घटना वाढत असताना पोलिसांनी अंबड भागात कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार, अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील संजीव नगर भागात कोयत्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस नाईक किरण गायकवाड, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, पोलीस शिपाई दीपक जगताप, घनश्याम भोये, संदीप भुरे यांनी सापळा रचत कारवाई केली.

पोलिसांच्या या कारवाईत विक्रीसाठी आलेले १२ धारदार शस्त्र दुकानातून जप्त केले आहे. याप्रकरणी कोयता विक्री करणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल केला असून अंबड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पिउधील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार कैलास चव्हाण आणि पोलीस शिपाई अमीर शेख हे करत आहे.

अंबड परिसरासह नाशिक शहरात शस्त्रांचा नंगानाच होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. शस्र बाळगण्यास, विकण्यास बंदी असतानाही सर्रास पणे विक्री होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खून, हाणामाऱ्या, खुन्नसबाजीचे प्रकार वाढले असून त्यातून गल्लोगल्ली दादा, भाई तयार झाले आहे. जो ना तो कमरेला चाकू, सुरे घेऊन फिरताना दिसून येत असताना पोलिसांनी केलेली ही कारवाई या घटनांवर वचक ठेवील अशीच आशा व्यक्त केली जात आहे.

हे देखील जाणून घ्या

आता अनेक नामांकित शॉपींग पोर्टल, वेबसाईटवर देखील शस्त्रे सहजरित्या उपलब्ध आहे. हा ऑनलाईनचा जमाना आहे असे म्हणतात. त्याप्रमाणे अनेक नामांकित वेबसाईटवर शस्त्रांची मोठी मालिकाच छायाचित्रांसह उपलब्ध आहे. ऑनलाईन वेबसाईट शॉपींग पोर्टलवर नेहमी काही ना काही ऑफर उपलब्ध असतात. त्यात शस्त्रांवर देखील ऑफर उपलब्ध आहे. असे लक्षात आले आहे. आकर्षक सूटच्या नावावर शस्त्र विकली जात असल्याने याकडे तरुणही आकर्षित होत आहेत आणि गुन्हेगारी घटना वाढत आहे.