बाप रे..! तरुणाच्या फुफ्फुसात अडकलेली सुई तब्बल ४ वर्षांनी काढली बाहेर

आजपर्यंत आपण पैसे किंवा इतर काही वस्तू पोटात गेल्याच्या घटना ऐकल्या असतील मात्र फुफ्फुसात सुई गेल्याची आणि ती ४ वर्ष तशीच फुफ्फुसात अडकून राहिल्याची घटना घडली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील आहे. एका ३३ वर्षीय तरुणाच्या अचानक तोंडातून रक्त यायला सुरुवात झाल्याने ही बाब उघडकीस आली.

एका शेतकरी कुटुंबातील ३३ वर्षीय युवकाच्या फुफ्फुसात ही सुई अडकली होती. विशेष म्हणजे तब्बल ४ वर्ष ही सुई त्याच्या फुफ्फुसात अडकून राहिली. त्यानंतर अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून काढण्यात आली. सध्या युवकाची प्रकृती स्थिर असून तो अगदी ठणठणीत आहे.

चार वर्षांपूर्वी सुई तोंडात धरली असतानाच त्याला अचानक खोकला आला. दरम्यान खोकल्यामुळे तोंडातील सुई थेट घशात गेली. घशात गेलेली सुई फुप्फुसात अडकली. मात्र त्यानंतर आता खोकला आल्यावर तरुणाच्या तोंडातून रक्त पडू लागले. तोंडात रक्त येत असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची चिंता वाढली होती.

त्याला तात्काळ रुग्णालयात आणलं. तिथे त्याच्या उजव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात सुई अडकल्याचे निदान झाले. त्यामुळे रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ यांनी तरुणाची शस्त्रक्रिया करुन फुफ्फुसात अडकलेली सुई बाहेर काढली आहे. तसेच शस्त्रक्रियेच्या दोन दिवसांनंतर या तरुणाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

तोंडाद्वारे अनेकदा अशाप्रकारे काही वस्तू गेल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. लहान मुलांच्या बाबतीत अशा घटना अधिक घडतात. मात्र त्याचा तात्काळ खुलासा आणि विलाज होतो. या घटनेत मात्र ४ महिनेही नाही तर ४ वर्ष या युवकाच्या फुफ्फुसात सुई अडकलेली होती .

अनेकदा लहान मुलांना हातात आलेली प्रत्येक वस्तू तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा चुकून एखादी वस्तू गिळली जाते. ज्यात पैशांचे कॉईन, खेळण्याची वस्तू याचा समावेश असतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच लहान मुलं खेळत असताना त्यांच्या आजूबाजूला नुकसान होईल अशा वस्तू ठेवू नयेत याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे.