नाशकात ठाकरे गटाला धक्का! माजी पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश..

चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. हे गट निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली. खासदार, आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील झाले. तर नाशिकमधील आमदार आणि खासदार देखील शिंदे गटात गेले. शिवसेनेला गळती लागली असताना नाशिकमधून मात्र ठाकरेंना सोडून कोणताही मोठा पदाधिकारी शिंदे गटात सामील झाला नव्हता. अशात आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तीने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

नाशिकच्या पाथर्डी आणि इंदिरानगर परिसरात उद्धव ठाकरे यांचे कट्टर समजले जाणारे सेनेचे माजी पदाधिकारी वसंत पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात रविवारी अधिकृत प्रवेश केला. तर हा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आणि माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी घडवून आणला.

शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख वसंत पाटील यांच्यासह यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सफाई आयोगाचे माजी अध्यक्ष आणि उपेक्षित दलित सामाजिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान, प्रभाकर घेंगट यांच्यासह परिषदेच्या अनेक प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी, शेकडो कार्यकर्त्यांनी आणि नाशिक शहरातील शिवसेनेचे माजी उपमहानगर संघटक प्रकाश दोंदे यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय माशीलकर, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख जयंत साठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेले वसंत पाटील यांची नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. वसंत पाटील हे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या जवळचे पदाधिकारी होते, याशिवाय डेमसे यांचे विश्वासू म्हणून ओळख आहे. वसंत पाटील यांचा हा पक्षप्रवेश त्यांचे जवळचे असलेले डेमसे यांनी ही चाल तर खेळली नाही ना ? अशी चर्चा नाशिकच्या पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रभाग ३१ मधील उमेदवार हा खांदेश पट्ट्यातील असल्यास निवडून येण्याची शक्यता अधिक असते, त्यात पाटील हे खांदेश पट्ट्यातील असल्याने डेमसे यांचाही शिंदे गटात जाण्याचा विचार असावा अशी शंका घेण्यास वाव आहे.