अभिनेता सिद्धार्थ जाधवला नाशिक सुविचार गौरव पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक येथील प्रतिष्ठित अशा सुविचार गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ५ मार्च रोजी अभिनेता चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar), अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांच्यासह १० मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सुविचार मंचचे आकाश पगार यांनी दिली आहे.

दरम्यान या कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्काराने मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असल्याचे पगार म्हणाले.

समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या एकूण १० मान्यवरांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आली.

चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.