भाजप नेते जयकुमार रावल विरोधात आदिवासी विकास परिषदेचे उद्या मोर्चाचे आयोजन

शिंदखेडा तालुक्यातील भाजप आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर दोंडाईचा पोलीस ठाण्यात आदिवासी समाज बांधवांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या वेळी शिंदखेडा दोंडाईचा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांनी आदिवासी समाजातील बांधवांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे आणि यावरून हे प्रकरण चांगलेच पेटले असून आता आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, रावण दहनाला आदिवासी संघटनांनी नकार दिला आणि त्यानंतर रावणाच्या पुतळ्याची आदिवासी बांधवांकडून तोडफोड करण्यात आली. मात्र आदिवासी बांधवांकडून तोडफोड करण्यात आल्यानंतरही पुतळा पूर्ववत करून रावण दहन करण्यात आले. रावण दहनाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आदिवासी समाज बांधवांना आमदार जयकुमार रावल यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.

अशात आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांनी धुळे जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांना जयकुमार रावल यांनी केलेल्या जातीवाचक शिवीगाळा विरोधात मोर्चासाठी आव्हान केले आहे. त्यानुसार ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व संघटनांनी चर्चासत्र आणि निषेध मोर्चाचे नियोजन केले आहे. या मोर्चात सर्व समाज बांधवांना, सर्व संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आदिवासींचा आवाज सरकार तसेच पोलीस प्रशासन पर्यंत पोहोचण्यासाठी या हक्काच्या लढाईमध्ये उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे सध्या धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले असून जयकुमार रावल हे धनदांडगे असल्यामुळे त्यांना पोलीस अटक करत नाहीये असा आरोप आदिवासी विकास संघटनेचे अध्यक्ष लकी जाधव यांनी केला आहे.

लोकशाही असलेल्या देशात सर्वांना समान न्याय मिळणे गरजेचे आहे. मात्र जयकुमार रावल यांना अटक का केली जात नाही, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. त्यानुसार ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व संघटनांनी चर्चासत्र आणि निषेध मोर्चाचे नियोजन केले आहे. चर्चासत्र आणि निषेध मोर्चाचे नियोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव, भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्यचै दीपक अहिरे, सर्व धुळे नंदुरबार जळगांव संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वांनी संघटनेच्या नावाखाली नाही तर समाजाच्या नावाखाली उपस्थित राहून समाजाची एकता आणि शक्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्याला दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे.