लडाखमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’..?

लडाखस्थित समाजसुधारक सोनम वांगचुक यांनी आज पासून ‘लडाखमध्ये ऑल इज नॉट वेल’ चा नारा दिला आहे. सोनम वांगचुक हे लडाख वाचवण्यासाठी आजपासून पाच दिवसांचं उपोषण करणार आहेत. लडाखमधील हिमनद्या नामशेष होण्यापासून वाचवण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

सोनम वांगचुकने हिमालयीन प्रदेश विशेषत: लडाखच्या हिमनद्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वांगचुक यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे १३ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी देशातील आणि जगातील लोकांना पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील ‘लडाख’ला मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर लडाखमधील हिमनद्या नामशेष होण्यापासून वाचवण्याची विनंती पंतप्रधान मोदींना केली आहे.

वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात “२६ जानेवारीपासून पाच दिवसांचं लाक्षणिक उपोषण करणार आहे, जेणेकरुन हा मुद्दा मांडता येईल, खारदुंग ला इथे उणे ४० अंश तापमानात उपवास केल्यानंतर मी वाचलो तर मी तुम्हाला पुन्हा भेटेन.’ तर सिंगल यूज प्लास्टिक’वर बंदी आणल्याबद्दल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे.

कोण आहे सोनंम वांगचुक ?

सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक. बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘३ इडियट्स’मध्ये आमीर खानने साकारलेली रणछोडदास छांछड उर्फ ​​’रँचो’ ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्याकडून प्रेरित होती. या चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला, पण आज खुद्द सोनम वांगचुक यांनी ‘ऑल इज नॉट वेल’ म्हणत लडाखमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे सांगितले आहे.

सोनम वांगचुक यांनी तो व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आणि पंतप्रधान मोदींना आवाहनकेले आहे. “लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही! (ऑल इज नॉट वेल इन लडाख) माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्यावरण वाचवण्याचे आवाहन करत आहे.” – नाजूक लडाखला सुरक्षा प्रदान करा. सरकार आणि जगाचे लक्ष वेधण्यासाठी, मी २६ जानेवारीपासून खारदुंगला पास येथे ५ दिवस ४० डिग्री सेल्सियस तापमानावर उपोषणाला बसण्याची योजना आखत आहे.”