सुरगाण्याला सहा महिन्यानंतर मिळाले तहसीलदार

सुरगाणा । प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातून तहसिलदार किशोर मराठे यांची १३ जुलै रोजी मालेगाव येथे बदली झाल्याने तेव्हा पासून तहसिलदार पद रिक्त होते. या कालावधीत नाशिक येथील कैलास पवार यांनी तात्पुरता स्वरूपात कार्यभार सांभाळला होता.

या काळात प्रभारी म्हणून नायब तहसिलदार राजेंद्र मोरे हे काम पहात होते. तालुका आदिवासी क्षेत्रात असल्याने शासनाच्या अनेक योजना, नागरिकांच्या समस्या, नैसर्गिक आपत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कोरोना काळ असल्याने उद्धभवणा-या समस्या आदी मुळे मोरे यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित तहसिलदार सचिन मुळीक यांची सुरगाणा तालुका तहसिलदार पदी नियुक्ती झाली आहे. तालुका अतिदुर्गम पेसा भागाचा असल्याने तरुण होतकरु तहसिलदार यांची नियुक्ती झाल्यने शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे.त्यांचे पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

‘माझी नियुक्ती शासना तर्फे प्रथमच आदिवासी पेसा क्षेत्रात झाली आहे. हि बाब माझ्या दृष्टीने हितावह असणार आहे. आदिवासी क्षेत्रातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. निश्चितच जनतेच्या सहभागातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जातील.आदिवासी क्षेत्रात काम करत असताना खुप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असले तरी माझ्या दृष्टीने काम करण्याची संधी व नवनवीन आव्हाने पेलत समस्यांवर तोडगा काढला जाईल. – सचिन मुळीक, तहसिलदार सुरगाणा