डान्स नडला! दाजीबा मिरवणूकीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी

होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी नाशिकची ऐतिहासिक प्रथा असलेली दाजीबा मिरवणूकित तलवारींचा नाच केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी दाजीबा मिरवणुकीची अनोखी परंपरा आहे. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदा दाजीबा मिरवणूक काढण्यात आली. मात्र या मिरवणुकीत तलवारीचा नाच केल्याप्रकरणी व मिरवणूक जागेवर न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाजीबा मिरवणूक एकाच ठिकाणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याचे उल्लंघन झाल्याने आयोजक विनोद हिरामण बेलगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

तर पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरवणुकीत तलवारी तसेच कोयत्याचा वापर केल्याने भारतीय कायदा व मुंबई पोलीस कायदा अन्वये यश राजेंद्र जाधव, अमित प्रजापती, रोहित चौरासिया आणि तुषार पहाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.