ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले भाऊलाल तांबडे यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती !

नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाकडून नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती झाली आहे. तर भाऊलाल तांबडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबतच शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून आता नाशिकमध्ये देखील नियुक्त्या सुरू करण्यात आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर सेनेला गळती लागली असून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ‘धक्के पे धक्का’ देत आहे. नाशिकमध्येही एकनाथ शिंदेंकडून नियुक्त्या करण्यात आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील सैनिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने उद्धव ठाकरेंच्या सेनेतील अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हा प्रमुख पदी अनिल ढिकले तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनसामान्यांची काम मार्गी लावण्यासाठी गावागावात शाखा उघडाव्यात अशा सूचना वजा आवाहनच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. ढिकले यांच्याकडे देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर तर तांबडे यांच्याकडे सुरगाणा, कळवळ, दिंडोरी, पेठ आणि निफाड या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. नाशिक ग्रामीण पूर्व तालुका प्रमुख पदी सुभाष शिंदे यांची तर नाशिक ग्रामीण पश्चिम तालुका प्रमुख पदी महादेवपुरचे सरपंच विलास सांडखोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव सेनेच्या या शिलेदारांनी शिंदे गटात उडी मारल्याने शिंदे गटाकडून पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकारणाने अनेक वळण घेतली आहेत. आधी उद्धव ठाकरेंचा सत्तेतून पाय उतार, मविआ सरकार ढासाळणं. मग सत्तापालट होऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन होणे. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांचा खरी शिवसेना कोणाची यावरून वादांग. शिवसेना पक्षासोबत धनुष्यबाण निशाणी वरून रस्सीखेच सुरू होणं. त्याबरोबरच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार याबाबत दोन्ही गटात वाद. हे सर्व पाहता एकेकाळी एका गटात असलेले एकमेकांना सहकार्य करणारे एकमेकांचे कट्टर विरोधक कसे झाले आणि कट्टर विरोधकांची भूमिका दोन्ही गट किती चोखपणे बजावत आहे. याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्ष आहे. शिंदे गटाने पुकारलेलं हे बंड राज्यासाठी काहीसं जुनं झालं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र या बंडाची आग पूर्णपणे विझलेली नाही. स्थानिक पातळीवर अद्यापही उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांचा शिंदे गटात प्रवेश सुरू आहे आणि शिंदे गटाकडून नियुक्त्या सुरूच आहे.