मोठी बातमी..!गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरात पावसाने जोर धरला असून धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे .आता प्रशासनाच्या वतीने धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे आज दुपारी 3 वाजता 500 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे तर उद्या सकाळी 6 वाजता 1000 क्युसेसने गंगापूर धरण्यातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. जर पावसाचा वेग असाच राहिला तर पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.



गेल्या दोन ते तीन दिवसापासून नाशिक सह गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात कधी हलक्या कधी मध्यम तर कधी जोरदार स्वरूपाच्या सरी बरसत आहेत पावसाची सतत धार सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरण साठ्यातही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे . गंगापूर धरण पाणलोट क्षेत्र असलेल्या परिसरात तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाण्याच्या पातळीत अधिक वाढ होत आहे.पुढील पावसाची स्थिती लक्ष्यात घेऊन आता नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.



जुलै महिन्या आधी नाशिक शहरावर पाणी कपातीचे संकट गोंगावत होते . परंतु जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने गंगापूर धरणाच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तेव्हा देखील धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात आला होता. पावसच्या काहीश्या विश्रांती नंतर पावसाने जोर धरल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे गंगापूर धारणासह पालखेड,दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.