मोठी बातमी ! नाशिक पदवीधर निवडणूकीत मोठा ट्विस्ट

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेच्या शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

‘अपक्ष अर्ज भरला असला तरी मी महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याच यावेळी ते म्हणाले. तर वेळेवर काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून आज सुधीर तांबेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्म आल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे.

दरम्यान सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटून ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सत्यजित तांबे यांनी दिली आहे. तर नवीन तरुणांना संधी मिळावी म्हणून मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची भावना डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे. माघार जाहीर करत सत्यजीत तांबे यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध नाही..सत्यजीतकडे व्हिजन आहे. गेली २० वर्ष तो संघटनेत काम करतोय. आताही तो चांगला काम करेल, असा विश्वास डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला आहे.

‘ही जागा बिनविरोध करण्यासाठी मी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना विनंती करणार आहे. विधान परिषदेच्या अनेक जागांच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. मागची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही जागा देखील बिनविरोध करावी, अशी विनंती मी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना भेटून करणार आहे, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील सस्पेन्स संपला असून या ठिकाणी एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारी अर्ज भरण्यास काही तासांचा वेळ आहे. भारतीय जनता पक्षाकडून आधी सस्पेन्स वाढवला गेला. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिकच्या विभागीय कार्यालयात एकाच गाडीतून दाखलही झाले होते. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे खुलासे होत असून काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.