मोठी बातमी..! नाशिक सह 32 ठिकाणी अशी झाली आयकर विभागाची सर्वात मोठी कारवाई

नाशिक : जालन्यात आयकर विभागाने एक मोठी कारवाई केली आहे . मिशन स्टील राबवत स्टील कंपन्यानमध्ये छापा टाकला आहे . या छाप्यात 350 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाई नंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे .आयकर विभागाच्या आत्तापर्यंतच्या कारवाईतील सर्वात जास्त रोख रक्कम या कारवाईतील असल्याचे म्हटले जात आहे . तीन ते आठ ऑगस्ट दरम्यान ही कारवाई चालली असून जालन्यातील दोन उद्योजकांना रडारवर घेऊन या कारवाईला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयकर विभागच्या सूत्रांनी दिली आहे.


कारवाईदरम्यान 56 कोटींची रोख रक्कम 14 कोटींचे सोने, सोन्याचे दागिने , बिस्किट जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेली रक्कम मोजताना आयकर विभागाला नाकीनऊ आले आहेत. रक्कम मोजण्यासाठी १३ ते १४ तास लागले आहेत . सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील एवढी रक्कम आणि दागिने , सोन्याचे बिस्किट कारवाईत जप्त करण्यात आले आहे. छापा टाकल्यानंतर कपाटामध्ये, बेडमध्ये ,कपाटाच्या खाली फार्म हाऊस मध्ये ,अशा विविध ठिकाणी लपवलेली रोख रक्कम सापडली आहे. आयकर विभागाकडून मोठी गुप्तता बाळगून हि कारवाई केली आहे.

नाशिक पुणे आणि नागपूर विभागाच्या इन्कम टॅक्स टीमची कारवाई

जालन्यात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात 250 पेक्षा अधिक अधिकारी – कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या गटाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत .कारवाई साठी सुमारे 150 खाजगी गाड्यांचा वापर केला आहे. तर एकाच वेळी दोन कंपन्यांच्या 32 वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. जालना ,औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे ,आणि कोलकत्ता अशा 32 ठिकाणी नाशिक – पुणे – नागपूरच्या इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकले आहेत. हा छापा टाकल्यानंतर आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात कर चोरी केल्याचा संशय आला आहे.
आयकर विभागाची टीम वराती म्हणून शहरात आले होते. त्यांच्या वाहनांवर लग्नांचे स्टीकर्स चिटकवण्यात आले होते. तर काही गाड्यांवर दुल्हनिया हम ले जायेंगे असे कोडवर्ड लहिले होते.