मोठी बातमी..! नाशिकमध्ये तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी येथील नगर परिषद तलावामध्ये ३ जणांचा बुडून मृत्य झाल्याची घटना समोर येत आहे. इगतपुरीत दोन दिवस आधीच २ भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक घटना समोर आली आहे. या घटनेत इगतपुरी येथील स्थानिक युवकासह पाहुणे आलेले दोन जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच बुडत असलेल्या दोघांना वाचविण्याच्या नादात तिसरा बुडाला असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार. हे तिघे जण इगतपुरीच्या नगर परिषद तलाव येथे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दोघांना बुडताना पाहून तिसरा त्यांच्या मदतीला गेला असता तो देखील बुडाला. दरम्यान त्यांना बाहेर काढण्यासाठी नगर परिषद कर्मचारी, जनसेवा प्रतिष्ठान व स्थानिक युवकांनी तलावात उड्या घातल्या. त्यानंतर बुडालेल्या तिघांना काढले बाहेर काढण्यात आले आणि त्यना तात्काळ इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र उपचार सुरू असताना तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान त्यांच्या मृत्यूची बातमी बाहेर येताच रुग्णालय परिसरात काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने या तिघांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीचं इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले दोघे सख्खे भाऊ पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. दोघे बुडाल्यानंतर त्यांचा शोध सुरु होता. तब्बल तीन दिवसांनी त्यांचे मृतदेह मिळून आले. या सर्व घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा एक नवीन घटना इगतपुरी मधूनच समोर आली आहे.

इगतपुरी तालुक्यात ५ दिवसांपुर्वी पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे रा. आवळखेड हे दोघे सख्खे भाऊ देवळे गावाजवळ दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. दरम्यान यावेळी एकजण पाण्यात बुडत होता. भावाला पाण्यात बुडताना बघून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र दोघांच्या नशिबी जणू मृत्यू अटळ होता. भावाला वाचवत काठावर आणीत असतांना अचानक दोघेही बुडाले होते.

ही बाब जवळील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाला पाचारण केले. बचाव पथक या ठिकाणी आल्यानंतर बचावकार्य सुरु झाले. मात्र त्यांना सोडताना सुरुवातीला बचाव पथकाच्या हाती काहीही लागले नाही. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी लागलेल्या होत्या परंतु त्यांना शोधण्यात यश येत नव्हते. अखेरीस तीन दिवस बचाव कार्य सुरु राहिल्यानंतर आज त्या दोघांचे मृतदेह हाती लागले होते.