भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा वादग्रस्त विधान!

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता असून त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीकास्त्र डागले जात आहे. मविआचे धंगेकर महात्मा गांधींनी प्रचाराला घेऊन येतील. शेवटच्या दोन दिवसांत धंगेकर गांधींना स्वर्गातून घेऊन येतील, त्यांना म्हणावं ते वर्षभर पुरतील का? असे वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर घणाघात केला असून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र डागत आहेत.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“महात्मा गांधींना स्वर्गातून प्रचाराला घेवून येईल. का हो ताई महात्मा गांधींना धंगेकर स्वर्गातून प्रचारांला घेवून येतील. तेव्हा म्हटले पाहीजे की, आता तुम्ही महात्मा गांधींना प्रचाराला बोलावले तर ते आम्हाला वर्षभर नाही पुरणार.” असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी आता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले असून राजकीय क्षेत्रात याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

अजित पवारांचे टीकास्त्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यावरून त्यांना लक्ष केले असून ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य अतिशय हीन आहे. आचारसंहीतेचे उल्लंघन होईल असे बोलू नये. त्यांनी काय बोलावं काय नको हे कळायला हवे. महात्मा गांधी आणि मविआचा उमेदवार यांच्याबद्दल वक्तव्य असो की, शरद पवारांवरील वक्तव्य असो, चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतूलन बिघडले असेच म्हणावे लागेल असा घणाघात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.

कॉंग्रेसचे टीकास्त्र

काँग्रेसनेते अतुल लोंढे म्हणाले की, यांना महत्मा गांधींची भीती यांना 1925 वर्षांपासून वाटते. आजही त्यांची भीती आहे. याचा अर्थ असा होतो, गांधींच्या विचारावर चालणारी काँग्रेस यांच्या हुकूमशाहीला आणि मनुस्मृतीला अडसर ठरत आहे. मात्र काँग्रेस कधीही आजारी व्यक्तीला प्रचारासाठी बाहेर काढणार नाही, वाटल्यास निवडणूक सोडून देईल. यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ती टिळक यांच्यासोबत तेच केल्याचा लोंढे म्हणाले आहेत.