दृष्टिहीन आर्यन बारावी परीक्षेत महाविद्यालात प्रथम..!

नाशिक : शिक्षणाची जिद्द असेल तर विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो, हे पुन्हा आज आर्यन धस या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. शिक्षणाच्या जिद्दीने यश संपादन करणाऱ्यांमध्ये नाशिकच्या आर्यन धसचा नंबर आता अग्रक्रमाने घेतला जाईल. नाशिकच्या डी.डी. बिटको बॉईज महाविद्यालयात शिकणाऱ्या दृष्टहिन आर्यन धसने बारावीत तब्बल ९१ टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आर्यनने ९१ टक्के गुणांसह महाविद्यालयात पहिला क्रमांक पटकावला आहे.

मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यनला आपली दृष्टी गमवावी लागली. मात्र नियतीच्या अन्यायासमोर आर्यन खचला नाही आणि त्याने आपली शिक्षणाची जिद्दही सोडली नाही. आर्यन धस या विद्यार्थ्याने लेखनिकाच्या मदतीने परीक्षा देत, बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे दृष्टिबाधेवर मात करून आर्यनने केवळ त्याच्या श्रवणशक्तीच्या जोरावर हे यश प्राप्त केल आहे. परीक्षेचा सर्व अभ्यास ऑनलाईन पद्धतीने केवळ आणि केवळ ऐकून केला. दृष्टिबाधेमुळे वाचता, लिहिता येणे शक्य नसल्यामुळे, मुलांमधील स्पर्धेचा तणावही नव्हता त्यामुळे केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आर्यनच्या शिक्षणाच्या जिद्दीनं त्याच्यात हळूहळू आत्मविश्वास वाढवला गेला. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळवू शकला. आर्यनने त्याच्या श्रवणशक्तीद्वारे संपूर्ण अभ्यास ग्रहण केला. आणि अकरावीतील कौशल नंदकिशोर मोराणकर या विद्यार्थ्याने त्याची लेखनिक म्हणून पेपर लिहिण्यास मदत केली.

शिक्षणाची आवड असणाऱ्या आर्यनला कुटुंबीयांसोबतच शाळेतील शिक्षकांचीही बहुमूल्य मदत झाली असल्याचे आर्यनचे पालक सांगतात. मणक्याची मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर हळूहळू दृष्टीच हरवलेल्या आर्यनला दिसेनासे झाले आणि ऑनलाईन शिक्षणही कसे घ्यावे, असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता. दृष्टीबाधित परिस्थितीत कुटुंबीयांनी आर्यनच्या क्षमतेवर विश्वास दाखवत, त्याला वेगवेगळी पुस्तके वाचून दाखव श्रवणशक्तीद्वारे अभ्यासासाठी पाठबळ दिले. आर्यनसाठी जणू ही आलेली संधीच होती. आणि आर्यनने आलेल्या संधीचे सोने केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर आर्यनचा दुणावला आत्मविश्वास… बारावीच्या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम आल्याने आता आर्यन धस या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास दुणावला. आत्मविश्वासाच्या जोरावर आयआयटीमधून इंजिनियरिंग करण्याचे ध्येय ठरवले आहे. आपल्यातील कमीपणाचे उदाहरण जगासमोर न ठेवता, आजच्या प्रतिस्पर्धी वाढलेल्या विश्‍वात आर्यन धसने आपली जिद्द न सोडता उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे.