नाशकात नायलॉन मांजामुळे कापले गेले वृद्धाचे दोन्ही पाय

नाशिक : नायलॉन मांजामुळे नाशिकच्या गोदाघाटावर एका वृद्धाचे दोन्ही पाय कापल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या जखमी वृद्धास सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने धोका टळला आहे. मात्र या घटनेने नायलॉन मांजाची विक्री आणि वापर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी असलेले मदनलाल चंपालाल भुतडा (वय ७०) हे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गौरी पटांगणावरून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकला. यात इतर नागरिकांचेही पाय अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र मांजा ओढला गेल्याने मदनलाल भुतडा यांच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्याने त्यांचे दोन्ही पाय रक्तबंबाळ झाले. त्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दत्तात्रय जाधव यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची तब्येत स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नायलॉन मांजास बंदी असतानाही त्याची छुप्या मार्गाने विक्री होत आहे. तसेच पतंग प्रेमींकडूनही नायलॉन मांजाला मागणी असल्याचे दिसत असून तेही हा प्रतिबंधित मांजा वापरत आहे. नायलॉन मांजा लवकर तुटत नसल्याने त्यामुळे मनुष्य आणि पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्राणी पक्षांनाच नव्हे तर मनुष्याला देखील नायलॉन मांजा किती घातक आहे. याचे उदाहरण कित्येकदा समोर आले आहे. कित्येकदा तर दुचाकी स्वरांचा गळा नायलॉन मंजामुळे चिरला गेला आहे. आपल्या हौसेच्या नादात नायलॉन मांजा दुसऱ्यांच्या मृत्यूचे कारण बनायला नको हा विचार करणे यामुळे गरजेचे झाले आहे. नाशिक शहरात सर्रासपणे या मांजाचा वापर होत आहे. यावर शासनाने कठोर पाऊले उचलावी अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दत्तात्रय जाधव यांनी केली आहे.

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा..

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री सुरू आहे. मनाई आदेश असतानाही अशा घटना समोर येत आहे. शहरात नायलॉन मांजाच्या विक्रीला बंदी आहे तरी देखील सर्रासपणे त्याची विक्री होताना दिसत आहे. अशाच प्रकारे प्रतिबंधित नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्य दोन संशयितांना दोन दिवसांत नाशिकच्या वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्या घटनेत ४८ गट्टू असा ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ४८ हजार रुपयांचा नायलॉन मांजा त्याच्याकडून जप्त करत त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर त्या आधीच्या एका घटनेत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला कुंभारवाडा येथील एका जणाला भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.