मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर!

नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. शहरातील डोंगरेवसतीगृह येथे भरवण्यात आलेले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गद्वारे आयोजित कृषी महोत्सवाला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. आज रविवारी(दि. २९) सकाळी १२ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे या कृषी महोत्सवामध्ये आगमन होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले डोंगरेवस्ती गृह येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गद्वारे आयोजित कृषी महोत्सव भरवण्यात आले आहे. या महोत्सवाला आतापर्यंत अनेक नेतेमंडळीनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यात आता या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजेरी लावणार असून त्यांचे आज शहरात आगमन होणार आहे.

आज या कृषी महोत्सवाचा पाचवा दिवस असून आतापर्यंत या शेतकरी बांधव आणि नागरिकांचा महोत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभलेला आहे. तसेच आज या कृषी महोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यांचे १२ च्या सुमारास शहरात आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा असून कृषी महोत्सवाचा कार्यक्रम आटोपून ते औरंगाबादला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे अनेक वेळा नाशिक दौऱ्यावर आले आहेत.