मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला रक्त लागलंय; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे, उद्धव ठाकरे हे संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते, असे संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला, ‘माविआच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेचा डाव होता. त्या कटाचा मी साक्षीदार आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, कुणावरही राजकीय सूडाने कारवाई करायची नाही, असं आमचं धोरण होतं असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कुणावरही राजकीय सूडाने कारवाई करायची नाही, असं आमचं धोरण होतं. उद्धव ठाकरे हे संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. त्यानुसार त्यांनी काम केलं आहे. नाही तर आम्ही संथगतीने तपास केले नसते”, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, जे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही, ते स्थिर किंवा वैध आहे हे कसं म्हणणार? त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. 40 चे 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे आमचा आशेचा किरण आहे. भीती आहे म्हणूनच विस्तार होत नाही”, असा घणाघात त्यांनी केला आहे.