मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा, परिस्थितीचा घेतला आढावा, पंचनामा करण्याचे आदेश

CM Eknath Shinde In Satana Nashik : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसानं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं अयोध्येचा दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे.

सटाणा तालुक्यातील निताने, बिजोटे, आखतवाडे शिवारातील नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली असून नासाडी झालेल्या शेतीपिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला जारी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- मुख्यमंत्री

राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती समजताच आम्ही सचिवांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले. आता नुकसानग्रस्त भागांमध्ये युद्धपातळीवर पंचनामे केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

राज्यातील ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत असतील तिथं सरकार त्यांच्या मदतीला धावून येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. याशिवाय राज्यात सध्या शेतकऱ्यांचं सरकार असून आम्ही बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे.

शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. तो सर्वांना जगवतो. त्यामुळं त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान येण्यासाठी मी प्रभू श्रीरामांना साकडं घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.