प्रजासत्ताक दिनाच्या फेरीत नववीतील विद्यार्थीनीचा मृत्यू; नाशकातील दुर्दैवी घटना

नाशिक : जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या काढलेल्या फेरीत एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुजा दादासाहेब वाघ असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता नववीत शिकत होती. पुजला जन्मापासूनच श्वास घेण्यास त्रास असून तिच्या फुफ्फुसाला छिद्र होते.

संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना दुसरीकडे नांदगाव तालुक्यातील जातेगावमध्ये दुर्दैवी घटना समोर आली आहे. जातेगावच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणासाठी विद्यालयाकडून प्रभात फेरी काढली होती. या प्रभात फेरीत विद्यार्थिनी पुजा वाघ देखील सहभागी होती. प्रभातफेरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रमासाठी जात होती. वाटेत विद्यार्थ्यंनाकडून ‘प्रजासत्ताक दिन विजयी असो, वंदे मातरम’ असे नारे दिले जात होते. पूजा देखील मोठ्याने घोषणा देत होती. मात्र प्रभात फेरी सुरू असताना अचानक तिला चक्कर आली, शिक्षकांनी तत्काळ बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

तेथून ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र नांदगावला घेऊन जात असताना रस्त्यातच पुजाचे निधन झाले. पुजला जन्मापासूनच श्वास घेण्यास त्रास व्हायचा. तिची तपासणी केली असता तिच्या फुफ्फुसाला छिद्र आढळून आले होते. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र शस्त्रक्रिया होण्याआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या जाण्याने जाते गावावर शोककळा पसरली आहे.