‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, असे आवाहन राज यांनी केले आहे.



राज ठाकरे यांचे पत्र

या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा.


सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.

दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती.

राज यांची मागणी मुख्यमंत्री मान्य करणार?

ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी सतत केली असून त्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आग्रही आहेत. तसेच कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या नेत्यांनी देखील ओल्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष केले जात असताना राज ठाकरेंच्या या मागणीकडे सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.