धनगर समाज ही आरक्षणासाठी आक्रमक…. राज्य सरकारचा निषेध.

अहमदनगर:- मराठा समाजाला (MARATHA RESERVATION )आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या १६ दिवसापासून जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मनोज जरांगे (MANOJ JARANGE PATIL )यांचं उपोषण सुरू आहे. त्या पाठोपाठ आता धनगर समाज ही आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण आहे. परंतु एसटी प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज करत आहे.

१९८५- ८६ साली यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. परंतु केंद्र सरकारच्या सूचीमध्ये धनगड नावाच्या जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे. मात्र धनगर आणि धनगड हे दोन्ही एकच आहे परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे धनगड हा शब्द झाल्याने धनगर समाजाचे आरक्षण रखडले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ३०० हुन अधिक तहसील कार्यालयाने राज्य सरकार ला पत्र दिल आहे की धनगड जातीचा दाखला आजपर्यंत दिला गेलेला नाही. त्यामुळे धनगड जात अस्तित्वात नसून ती धनगरच आहे परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे धनगर चे धनगड झालेले आहे.

धनगर समाजाला (DHANGAR RESERVATION )ST प्रवर्गातून साडेतीन टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी(CHONDHI ) येथे धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे.
गेल्या आठवड्याभरा पासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याने धनगर समाजातुन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या तरुणांनी मुंडन करत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला आहे. मागील सात दिवसांत सरकारमधील एकही मंत्री आंदोलन स्थळी आलेले नाही त्यामुळे धनगर समाजाच्या आंदोलनाची राज्य सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप धनगर समाजकडून करण्यात येत आहे.

मागील आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलन उपोषणामुळे अण्णासाहेब रुपणवर, सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली आहे. सरकार धनगर समाजाच्या आंदोलनगांभीर्याने न घेतल्यामुळे धनगर समाजाकडून तीव्र निषेध केला जात आहे. असे यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिक दांगडे यांनी सांगितले आहे.