शिवसेनेचा दसरा मेळावा! ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव…

शिवसेनेतील वाद हा दिवसेंदिवस टोकाचा होत चालला असून दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटात व शिंदे गटात खडाजंगी सुरु आहे. आता हा वाद देखील न्यायालयात पोहोचला असून दसरा मेळाव्याला पूर्व परवानगी मागूनही पालिकेने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी ( दि. २२) सुनावणी होणार असून कोर्ट काय निकाल देते यावर आता राज्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.


शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट

शिवसेनेचा दरसाल होणारा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होतो. शिवसेनेत मोठी बंडाळी झाली त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आणि फुटलेला गट म्हणजे शिंदे गट म्हणतो आम्हीच शिवसेना आहोत. त्यामुळे आता शिवसेनेचे राज्यात २ गट पाहायला मिळत आहेत. दोन्ही गट शिवाजीपार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहेत. आणि आम्ही तिथेच मेळावा घेणार असल्याचे ठासून सांगत आहेत. मात्र महापालिकेने दोन्ही गटांना शिवतीर्थावर मेळावा घेण्याची परवानगी नाकारली आहे. त्यातच काल उद्धव ठाकरे यांची गर्जना शिविर्थावरच होणार अश्या आशयाची पोस्ट देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

ठाकरे गट न्यायालयात

उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिका आम्हाला परवानगी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमच्या अर्जावर मुंबई महानगरपालिकेला तातडीने निर्णय देण्याचे आदेश द्या, तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. तर न्यायालयानेही याचिकेवर तातडीने सुनावणी गरजेची असल्याचे सांगून प्रकरणावर उद्या सुनावणी ठेवली आहे.