पहाटे महिलेला सुरू झाल्या प्रसूतीवेदना, रुग्णालयात जाण्यासाठी डोलीचा प्रवास कारण

रुग्णवाहिका किंवा कोणतेही वाहन त्या गावातून रुग्णालयापर्यंत जाऊ शकत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी डोली तयार केली. त्या डोलीतून महिलेचा प्रवास सुरू झाला.

ग्रामीण भागात आदिवासी वस्ती आहे. या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होते. नुकतीच एक मोठी घटना घडली. एका आदिवासी वस्तीतील महिलेला रात्री प्रसुतीवेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्याचा निर्धार केला. पण, रुग्णालयात जाण्यायोग्य रस्ते नव्हते.

रुग्णवाहिका किंवा कोणतेही वाहन त्या गावातून रुग्णालयापर्यंत जाऊ शकत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी डोली तयार केली. त्या डोलीतून महिलेचा प्रवास सुरू झाला. रुग्णालयात जाईपर्यंत अडीच किलोमीटरचा रात्री पायी प्रवास करण्यात आला. रुग्णालयात जाण्यापर्यंत महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह परत आणण्यासाठी पुन्हा डोलीचाच वापर करावा लागला. या घटनेमुळे आदिवासी नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो.

तळोघ ग्रामपंचायत हद्धीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती आहे. जुनवणेवाडीतून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना अडीच किमी अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्या. पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली.

महिलेला डोली करून झोपवण्यात आले

जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आले. अखेर दवाखान्यात पोहचल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यासाठीसुद्धा रस्त्याची समस्या असल्याने डोली करून न्यावे लागले. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात येत असतात. मात्र जुनवणेवाडीसारख्या अनेक गावांत रस्ताच नाही. त्यामुळे अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

आदिवासींसाठी बऱ्याच योजना शासनाच्या वतीने राबवल्या जातात. तरीही काही पाड्यांवर अतिशय कमी लोकसंख्या असते. अशा पाड्यांवर अजूनही सुविधा नाहीत. पाडे पक्क्या रस्त्याने मोठ्या गावांना जोडलेले नाहीत. त्यामुळे पाड्यांवर राहणाऱ्यांना पावसाळ्यात बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो.