दुख:द..! माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन; नाशकात घेतला अखेरचा श्वास

नंदुरबार या कॉंग्रेसच्या पारंपारिक मतदार संघातून सतत ९ वेळा निवडून आलेले माजी मंत्री माणिकराव गावित यांचे दुःखद निधन झाले आहे. नंदुरबारमधून तब्बल आठ वेळा खासदर म्हणून माणिकराव गावित हे संसदेत निवडून गेले होते. आजची राजकीय वर्तुळातील ही सर्वात मोठी आणि दुःखद अशी बातमी आहे. माणिकराव गावित यांनी देशाचे माजी गृहराज्य मंत्री पद भूषवले आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात माणिकराव गावित यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

असा होता जीवन प्रवास

नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी माणिकराव गावित यांचा जन्म झाला होता. त्यांचं शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झालं. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातुन ते सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून निवडून आले होते. तर १९८० साली गावित हे नवापूरचे आमदार झाले. १९८१ साली माणिकराव गावित हे प्रथमच खासदार झाले होते. यावेळी ते ४७ वर्षांचे होते.

टॉपटेन खासदारांपैकी एक

१९८१ साली माणिकराव गावित हे प्रथमच खासदार झाले होते. तेव्हा पासुन ते आतापर्यंत तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १,३०,७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले होते. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणा-या टॉपटेन म्हणजेच पहिल्या दहा खासदारांपैकी एक म्हणून संपूर्ण देशाला माणिकराव गावित यांचा परिचय आहे. १९८१ ते २००९ हा माणिकराव गावीत यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले होते. १९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८० ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. १९९० ते १९९६, १९९८-९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गीक वायु या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलं. १९९१ ते ९३ आणि १९९९ ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशो संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले.

१९९८-९९ या काळात लेबर अॅण्ड वेल्फेअर मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले. १९९९ ते २००१ या काळात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कल्याण समितीचेही सदस्य पद त्यांनी भूषवले. १९९०-९१ आणि १९९९-२००० या काळात लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भातील समितीचे ही ते सदस्य होते. सोनीया गांधी यांनी त्यांना २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून स्थान मिळवून दिले. असा अत्यंत विशेष आणि यशस्वी असा जीवन प्रवास माणिकराव गावित यांचा होता. त्यांच्या जीवन प्रवासाला आज रोजी पूर्णविराम मिळाला आहे. आज नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात माणिकराव गावीत यांची प्राणज्योत माळवली.