घरच्यांचा प्रेमाला विरोध! प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल..

सोलापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध असल्याकारणाने एका प्रेमीयुगलाने एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे यातील प्रियसी ही अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज रविवार (दि. २६)  सकाळी सोलापूरच्या कवठे या गावात घडली आहे. या घटनेने गाव परिसर हादरला असून संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज चव्हाण (वय. २५) असे प्रियकराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा मोहोळ येथील रहिवासी होता, मृत मुलगी ही मोहोळ तालुक्यात असलेल्या आपल्या मामाच्या गावी मागच्या वर्षी सुट्टीत गेली होती. येथेच या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले, सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र याची खबर कुटुंबीयांना लागली, आणि कुटुंबीयांची त्यांच्या प्रेमाला मान्यता नव्हती. त्यांच्या नात्याला कुटुंबियांचा विरोध होता. विरोधानंतरही ते दोघेही कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र एवढं असूनही घरच्यांचा वारंवार होणारा विरोध याला कंटाळून या दोघांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रेमीयुगलाने आज रविवारच्या सकाळी कवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला, ही घटना स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग, एक दुचाकी पोलिसांना आढळून आली आहे. गळफास काढून पोलिसानी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले आहे. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.