शेतकऱ्यांनी स्मशानात केली दिवाळी साजरी! अनोख्या आंदोलानाची चर्चा..

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सन साजरा करण्याची देखील आबळ असून या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखे आंदोलन केला आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगावमधील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले असून त्यांना या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र झालेल्या या नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी यावेळी मोठी घोषणाबाजी देखील केली.


काय आहे प्रकरण?

औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केले.

प्रशासनाला दिले निवदेन

शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले असून त्यात म्हणाले, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. अशात दिवाळी सारखा सण आला आहे, मात्र आमच्याकडे यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत असल्याचे निवेदनात आहे. तर यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. 

कृषीमंत्री सत्तारांनी बांधावर येऊन पहाव ओला दुष्काळ आहे की नाही

यावेळी बोलतांना शेतकरी म्हणाले की, पहिल्यांदा औरंगाबाद जिल्ह्याला कृषिमंत्री पद मिळाले आहे. मात्र असे असतांना अजूनही ओला दुष्काळ सारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सांगतायत. त्यामुळे त्यांनी आमच्या भागात येऊन काय परिस्थिती आहे हे पाहावे. कापसाच्या झाडाला फक्त दोन कैऱ्या लागल्या आहे.  त्यामुळे अशात कशी दिवाळी साजरी करणार असा आम्हाला प्रश्न पडला आहे. सरकारचे आमच्यावर लक्ष नाही. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत सरकराने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.