गृहमंत्र्यांच्याच सुरक्षेत त्रुटी; खासदाराचा PA सांगत आला शहांच्या जवळ

देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत लालबागच्या दर्शनाला आले होते, त्याच दरम्यान त्यांचा सुरक्षेत मोठी त्रुटी निर्माण झाल्याचे खळबळजनक वृत्त समोर येत आहे. देशाचे गृहमंत्री आणि त्यांच्याच सुरक्षेत अशी त्रुटी निर्माण झाल्याने मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली असून या संशयिताने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर घटना अशी की,

अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर शहा भाजप नेत्यांची बैठक घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे गेले. यावेळी त्यांच्याभोवती फिरणारी व्यक्तीही सागर बंगल्यात घुसली. आरोपीच्या गळ्यात ओळखपत्र होते. त्यामुळे कोणाला संशय आला नाही. काही वेळाने मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या नजरेस पडल्यावर ते संशयास्पद वाटले. यावेळी अधिकाऱ्यांनी मलबार हिल पोलिसांनी ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने अधिकृत एमएचएचा बँड मिळाला असल्याचा दावा केला आहे. याची पुढील चौकशी सुरू आहे.

संशयितास अटक

हेमंत पवार नावाचा हा व्यक्ती आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे भासवत होता. शहा यांच्या मुंबई दौऱ्यात हेमंत पवार या व्यक्तीने अधिकारी असल्याचे भासवून अमित शहा यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या आरोपात पोलिसांनी हेमंत पवार याला भादंवि कलम १७० आणि कलम १७१ अन्वये अटक केली आहे.

पोलीस काय म्हणताय ?

शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर असताना गिरगावात पोलीस बंदोबस्त पाहत असताना ही घटना घडली. सोमवारी गृहमंत्री अमित शहा मलबार हिलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानांना भेट देणार होते. अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा ब्लेझर घातलेला एक व्यक्ती दिसला. त्यांनी गृह मंत्रालयाचे ओळखपत्रही लावले होते. “तो व्यक्ती प्रतिबंधित परिसरात फिरत होता. काही तासांनंतर शहा हे एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले, तेव्हा तो व्यक्ती तेथेही तेथे दिसला. तेव्हा त्या व्यक्तीची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव हेमंत पवार असल्याचे सांगितले आणि आपण केंद्रीय एजन्सीचा सदस्य असल्याचे सांगितले.