रस्त्यांच्या खड्ड्यांवरून पालकमंत्री भुसे ॲक्शन मोडवर; १५ दिवसांत खड्डे बुजवा अन्यथा…

by : ऋतिक गणकवार

नाशिक : पावसाळा उलटून आता हिवाळा आला मात्र तरीही प्रशासन शहरातील खड्यांकडे कानाडोळाच करत आहे. यावर आता नाशिकच्या पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून महापालिका आयुक्तांना भेटून १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या १५ दिवसांत जर शहरातील रस्त्यांची सुस्थिती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करणार असा इशारा भुसे यांनी दिला. पालकमंत्री दादा भुसे आणि मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यात रात्री (दि. ३१) बैठक झाली असून पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना खड्ड्यांवरून धारेवर धरले आहे.

नाशिकरांनी पावसाळ्याचे ४ महिने या स्मार्टसिटीच्या खाड्यांमध्ये त्रास सहन करत काढले. यामुळे अनेकांना अतोनात त्रास झाला अनेकांचे कंबरडे जाम झाले. मात्र महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या दाव्यांशिवाय आणखी काही केल्याचे नजरेस पडले नाही. वरती पाऊस आणि खाली नाशिकचे स्मार्ट खड्डे यामध्ये नाशिककर हैराण झाले होते. मात्र पावसाळा उलटलाय तरीही अद्याप नाशिकचे स्मार्ट खड्डे जैसे थे! आहेत. अद्याप नाशिकच्या महापालिका प्रशासनाला जाग नाही म्हणून आता नाशिककरांना होत असलेला मनस्ताप बघता पालकमंत्री दादा भुसे शहरातील खड्ड्यांवरून ॲक्शन मोडवर आले आहेत.

दरम्यान, दादा भुसे आणि मनपा आयुक्त पुलकुंडवार यांच्यात सोमवारी रात्री (दि. ३१) बैठक झाली यात दादा भुसे यांनी मनपा आयुक्तांना खड्ड्यांवरून धारेवर धरले. तसेच १५ दिवसात शहरातील प्रत्येक खड्डा बुझवा अन्यथा १५ दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासनाचे आता तरी डोळे उघडून शहरवासियांचे हाल व मनस्ताप दिसेल का व यावर तातडीने उपायोजना करून खड्डे बुजविणार का असा प्रश्न आहे.