नाशकातला गणेशोत्सव जल्लोषात; ३७६ मंडळांना पोलिसांकडून परवानगी

नाशिक: आपले आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन झाले असून शहरातील सुमारे ३७६ गणेश मंडळांना शहर पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आलेली असून, यामध्ये ३९ मौल्यवान गणपती असल्याचे विशेष शाखेच्या वतीने सांगण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. यंदाचा उत्सव हा धूम-धडाक्यात साजरा होत असल्याचे आनंदी चित्र पाहायला मिळत आहे. बाप्पांच्या आगमनासाठी नाशिककरांनीही जय्यत तयारी केली असून, बाजारपेठाही सजल्या आहेत.


मागील दोन वर्ष कोरोनाचे सवट असल्याने नागरिकांना सन-उत्सव उत्साहात नव्हते साजरे करता आले पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नाहीच्या बरोबर असल्याने यंदाचे सन-समारंभ तसेच गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले असून गणेशोत्सव धूम-धडाक्यात साजरा करताना नागरिक दिसत आहेत. तसेच नाशिक शहरातही गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मित्र मंडळांनीही जय्यत तयारी केली आहे. मंडळांनी महापालिका आणि शहर पोलिसांकडून रीतसर परवानग्या घेत भव्य मंडप उभारले आहेत. गत दोन वर्षात कोरोनामुळे गणेशोत्सवासह अनेक समारंभावर निर्बंध लादण्यात आलेले होते.

परंतु दोन वर्षांनी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठाही बहरल्या असून, ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. शहरातील डोंगरे वसतीगृह, ठक्कर डोम यासह शहर व उपनगरांमध्ये ठिकठिकाणी ‘श्रीं’च्या मूर्तींचे स्टॉल्सवर गणेशभक्तांची गर्दी होती. शहरातील मुख्य आकर्षण असलेल्या गणेश मंडळांकडूनही भव्य मंडप उभारण्यात येऊन जय्यत तयारी केली आहे. तर घरगुती गणेशोत्सवासाठी बालगोपाळांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यंदा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सुमारे ३७६ गणेश मंडळांना शहर पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आलेली असून, यामध्ये ३९ मौल्यवान गणपती असल्याचे विशेष शाखेच्या वतीने सांगण्यात आले.