Video : आदिवासी आया-बहिणींना पाण्यासाठी आजही मरावं लागतं !

नाशिक । प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आजही ग्रामीण भागातील पाणी समस्या जैसे थे आहे. पाण्यासाठी रानोमाळ भटकणाऱ्या बायाबापड्यांचा संघर्ष आजही थांबलेला नाही. यावर भाष्य करणारी घोट ही शॉर्टफिल्म नाशिक जिल्ह्यातील पाण्यासाठी काम करणाऱ्या जल परिषद मित्रपरिवाराने सुजय फिल्म प्रॉडक्शनच्या प्लॅटफॉर्मवरून आणली आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

आतापर्यंत पाणी या विषयाला घेऊन अनेकांनी शॉर्टफिल्म, चित्रपट तयार केले. मात्र जल परिषद मित्र परिवाराने स्वतः या अनुभवातून जात वास्तव मांडलं आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आजही पाण्यासाठी माय मावल्यांना वणवण भटकावं लागतं. अशातच कधी उन्हाची लाही लाही असताना तर कधी रात्रीच्या अंधारात जीव मुठीत घेऊन पाणी शोधतांना.

एकीकडे पाण्याचा अपव्यय होत असताना दुर्गम भागातील आया बहिणींना आजही पाण्यासाठी मरावं लागत, अशी अंगावर शहारा आणणारी कहाणी या लघुपटातुन मांडण्यात आली आहे. त्र्यंबक तालुक्यातील एका दुष्काळी गावाचं वास्तव यात मांडण्यात आलंय. एक आई दिवसभर राबून आपल्या कुटुंबांचं पालन पोषण करते. मात्र तिला दिवसातील अर्धाअधिक वेळ पाणी आणण्यासाठी निघून जातो. अशातच घरात दारिद्र्य आणि गावात पाण्याचा तुटवडा याच्या कात्रीत ती सापडलेली असते. घरात पाण्याचा थेंब नसल्याने ती अन मूकबधिर असणाऱ्या आपल्या मुलीला घेऊन अंधारात पाणी शोधण्यासाठी जाते. दोन किलोमीटर अंधाराचा रास्ता तुडवल्यानंतर विहरीपाशी जाऊन पोहचते. पण अंधारात गर्भवती असेलली ती विहरीत पडते.

एकीकडे आई पडल्याचे पाहून मुकी असलेल्या तिच्या मुलीच्या तोंडून काहीच निघत नाही.. ती धावत पळत गावात जाते. मात्र तिचा एक भाऊ लग्नाच्या वरातीत तर दुसरा भाऊ क्रिकेट खेळण्यात गुंतून गेलेले असतात. अशावेळी ती आपल्या वृद्ध आजोबा अन कामाला निघालेल्या मामाला ही गोष्ट सांगते. ते हि तिच्या मुक्या देहबोलीतून.. पुढे मामासह इतर गावकरी धावत पळत विहरीपाशी जातात…!

एकीकडे देश आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनवीन झेप घेत असताना दुसरीकडे मात्र गावागावातील पाण्याचा प्रश्न मात्र कोणालाच सोडवता आला नाही हे वास्तव आहे. या माय माऊलीच पाण्याशिवाय पुढे काय होतं. हे पाहण्यासाठी तुम्हांला ही फिल्म जरूर पाहावी लागेल.

या लघुपटाची संकल्पना राकेश दळवी, दिग्दर्शन- योगेश रिझंड, भुषण पागी, पटकथा व संवाद लेखन – तुकाराम चौधरी यांनी केले आहे. मुख्य कलाकार म्हणून बाल कलाकार अश्विनी प्रकाश भिवसन, अंजना चौधरी, मनोहर खुताडे, देवचंद महाले, गीतेश्वर खोटरे यांनी काम केले आहे तर सह कलाकार म्हणून ज्ञानेश्वर गावित, प्रल्हाद पवार, मनोज चौधरी, दुर्वादास गायकवाड, अशोक बोरसे, नामदेव घुलूम यांनी काम केले आहे. याच बरोबर विशेष सहकार्य म्हणून देविदास कामडी, संजय गवळी, देवदत्त चौधरी, एन एस कुवर, रवि पवार, शरद जोपळे, दशरथ भोये, केशव गावित, बाळा गावित, विठ्ठल गावित (पोलिस पाटील) व खडक ओहोळ ग्रामस्थांसह जल परिषद मित्रपरिवार.