लम्पिच्या दहशतीला, नाशिक जिल्हा परिषदेचा परिणामकारक उतारा ..!

लम्पी ह्या जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून यामुळे जनावरांना मोठा धोका उद्भवत जनावराचा जीवही जाऊ शकतो, मात्र आता नाशिक जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी असून ह्या लम्पी आजारासाठी रोग प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून पशुपालकांनी जनावरांना लस देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांचेमार्फत जिल्हा परिषद सेस निधीतून सध्या 1,05,300 गोट पॉक्स लस (Goat Pox Vaccine) मात्रा तातडीने उपलब्ध करण्यात आलेली आहे.

राज्यातील या जिल्ह्यामध्ये आहे लंम्पीचा प्रादुर्भाव

महाराष्ट्र राज्यातील जळगांव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच नाशिक जिल्ह्यांतील काही भागात सद्यस्थितीत गाय वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.

जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आढळला प्रादुर्भाव

सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या गावांमधील जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पशुसंवर्धन खात्याच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ज्या गावात आजार आढळेल त्याचा परिसरातील 5 KM अंतरापर्यंत लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. त्यानुसार परिसरातील पांगरी खुर्द, मिठसागरे, फुलेनगर, मलढोन, वावी, पिंपरवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी व सायाळे येथील एकूण 7800 गोवर्गिय जनावरांना लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

कसा पसरतो हा आजार?

हा आजार गोचिड, गोमाश्या ,डास, मच्छर यांच्या चाव्याने पसरत असतो. ,म्हणून प्रत्येक गावात गोचिड, गोमाश्या, डास, मच्छर यांच्या निर्मुलनासाठी फवारणीचे औषधे उपलब्ध करून देण्याबाबत यापुर्वीच जिल्हातील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांना मा. लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांचेमार्फत आदेश देण्यात आले आहेत.

काळजी कशी घ्यावी?

लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनवरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.  बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. जनावरांमधून माणसांमध्ये हा आजार पसरत नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी या जनावरांचे दूध वापरात आणू नये असाही सल्ला दिला जातोय. लम्पी आजारात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले तरी दुध उत्पादनावर परिणाम होत असल्याने पशुपालकांनी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.