‘ग्रंथ तुमच्या दारी’..! नाशिकमधून ग्रंथ निघाले.. ह्युस्टन (टेक्सास) कडे..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : जगभरात गेली १३ वर्षे सतत विस्तारत असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानची (Kusumagraj Pratishthan) ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध करून देणारी वाचकप्रिय योजना! या योजनेतून अडीच कोटींपेक्षा जास्त रुपयांची पुस्तके वाचनासाठी भारत आणि भारताबाहेर 15 देशात फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. अमेरिकेतील (America) टेक्सास (Texas) राज्यातील ह्युस्टन (Houston) येथे वास्तव्यास असलेले, पण मूळचे भारतीय असलेले वाचनप्रेमी अमोल भोमे (Amol Bhome) यांना ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना भावली. त्यांनी या योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे (Vinayak Ranade) यांच्याशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधला आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना समजून घेतली. त्यानंतर त्यांना ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना खूपच भावली. त्यांनी त्यातील सर्व बारकावे आणि वाचनानंदासाठी किती उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध केली जातात हे समजून घेतले.

ह्युस्टन (टेक्सास) येथील मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत, म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर बघता बघता ह्युस्टन-टेक्सास येथील १० वाचक कुटुंबांनी देणगी रूपाने आर्थिक पाठबळ देऊन यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे अमोल भोमे यांच्या प्रयत्नातून ह्युस्टन-टेक्सास येथे एक-दोन नव्हे तर १४ ग्रंथपेट्या रवाना होत आहे. ह्या ग्रंथ पेट्यांच्या माध्यमातून ह्युस्टन येथे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा शुभारंभ होत आहे.

या एका ग्रंथ पेटीत 25 पुस्तके आहेत. प्रत्येक पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतात. विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यांसाठी उपलब्ध होतात. दर 3 महिन्यांनी पेट्या परस्परांच्या मध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वाना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत असते. भविष्यात जश्या ग्रंथ पेट्या वाढत जातात, तेवढी विविध प्रकारची जास्तीत जास्त पुस्तके आपल्या वाचकांना उपलब्ध होतात. मराठी वाचक जेथे, ग्रंथ तुमच्या दारी तेथे! या नावाने चालणारी ही योजना महाराष्ट्र (Maharashtra), गोवा (Goa), गुजरात (Gujrat), दिल्ली (Delhi), सिल्व्हासा (Silvhasa), तामिळनाडू (Tamilnadu), कर्नाटक (Karnatak) या ठिकाणी वाचकप्रिय ठरली आहे. तसेच देशाबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डी.सी., मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, बे एरिया, लंडन, श्रीलंका, ब्रिस्बेन, टोरंटो, आणि आता हुस्टन… याठिकाणी ही योजना पोहचली आहे.