नाशिकच्या बांधकाम विभागासमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

नाशिक : त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भवनसमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन (Half-naked protest of retired employees in Nashik) करण्यात आले आहे. या अर्धनग्न आंदोलनात जवळपास ७० ते ८० कर्मचारी सहभागी झाले असून, बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले आहे.

कालबद्ध पदोन्नती अंतर्गत पहिला लाभ पदोन्नती मिळावी, आश्वासीत प्रगती योजने अंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ मिळावा, २००६ ते २०१० या कालावधीत काल्पनिक वेतन वाढीचा फरक रोखीने अदा करावा, अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊन दहा ते बारा वर्ष झाले आहे. मात्र अद्याप देखील त्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात शासनाकडे चर्चा होऊनही प्रशासन स्तरावर मागण्या प्रलंबित असल्याने निषेध आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे राज्यभरात आंदोलन सुरु आहे. राज्यभरात सार्वजनिक बांधकाम विभाग भवनासमोर सेवानिवृत्त कर्मचारी अशाच प्रकारे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. दरम्यान नाशिक मध्ये देखील मोठ्या प्रमाणात सेवा निवृत्त अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भवनासमोर ठिय्या मांडला आहे.

सेवा निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या सार्वजनिक बांधकाम मधील पदावरून निवृत्त झालेले कर्मचारी हे आंदोलन करत आहेत. या पदाची निर्मिती १ जानेवारी १९९० मध्ये झाल्यानंतर या पदावर समावेशित झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने २००४ पासून समावेशन करून वेतन श्रेणीत घेतले आहे. मात्र ही पदनिर्मिती ज्या तारखेपासून झाली आहे, म्हणजे १ जानेवारी १९९० याच तारखेपासून आम्हाला समावेशन करून तिथून मिळणारे लाभ मिळावे, जेणेकरून सध्या मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ होईल. सध्या मिळणारे पेन्शन हे अत्यंत कमी असून तो आमच्यावर अन्याय आहे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हे कर्मचारी सेवानिवृत्त होऊन दहा ते बारा वर्ष झाले आहे. मात्र अद्याप देखील त्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. शासनाकडे चर्चा होऊनही प्रशासन स्तरावर मागण्या प्रलंबित आहे, त्याचाच निषेध करत हे निषेध आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.