एकाला वाचवायला गेला, दुसराही बुडाला; मन हेलावून टाकणारी घटना

नाशिकः इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले दोघे सख्खे भाऊ पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. दोघे बुडाल्यानंतर त्यांचा शोध सुरु होता. दरम्यान आज तब्बल तीन दिवसांनी त्यांचे मृतदेह मिळून आले आहे.

घटनेच्या अधिक माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यात तीन दिवसांपुर्वी पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे रा. आवळखेड हे दोघे सख्खे भाऊ देवळे गावाजवळ दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. दरम्यान यावेळी एकजण पाण्यात बुडत होता. भावाला पाण्यात बुडताना बघून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र दोघांच्या नशिबी जणू मृत्यू अटळ होता. भावाला वाचवत काठावर आणीत असतांना अचानक दोघेही बुडाले.

ही बाब जवळील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाला पाचारण केले. बचाव पथक या ठिकाणी आल्यानंतर बचावकार्य सुरु झाले. मात्र त्यांना सोडताना सुरुवातीला बचाव पथकाच्या हाती काहीही लागले नाही. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी लागलेल्या होत्या परंतु त्यांना शोधण्यात यश येत नव्हते. अखेरीस तीन दिवस बचाव कार्य सुरु राहिल्यानंतर आज त्या दोघांचे मृतदेह हाती लागले आहे.

आज सकाळच्या सुमाराला दोघा भावांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आले. स्थानिक नागरिकांनी घोटी पोलिसांना कळवल्यानंतर युवकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांना तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान एकाच कुटुंबातील दोघ सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर एकाच वेळी कुटुंबातील दोन सदस्य गेल्याने पिंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पंकज आणि कृष्णा या दोघांच्या पश्चात त्यांचा आई, एक लहान भाऊ, पंकजची पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. हे कुटुंब इगतपुरी तालुक्यातील फणसवाडी येथील आदिवासी पाड्यावरील रहिवासी आहेत. पिंगळे कुटुंबाला दोघा मुलांचाच आधार होता. मात्र दोघेही कमावते मुले दगावल्याने आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इगतपुरी तालुक्यात धरणांची संख्या जास्त असल्याने अनेकांचा उदरनिर्वाह हा मासेमारीवर चालतो त्यामुळे अनेक जवळपासच्या वाड्या-पाड्यावरील नागरिक मासेमारीसाठी धरणांवर येत असतात अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य, व्यवस्था आणि प्रशिक्षित पथक उपलब्ध करून देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील काही संघटनांकडून मागणी केली जात आहे.