नाशकात ढगाफुटीसदृश्य पावसाचे कारण काय ? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय हवामान तज्ञांचे मत !

नाशकात काल रात्री ( गुरुवारी ) मुसळधार पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. शहरात ठिकठिकाणी गुढग्यापर्यंत पाणी साचले होते, मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, एकाला आपल्या जीवाला देखील मुकावे लागले , हा पाऊस ढगफुटी सदृश असून हा जोरदार पाऊस का झाला याबद्दलचे सखोल विश्लेषण आंतरराष्ट्रीय हवामान आणि ढगफुटी तज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. त्यांनी केलेले विश्लेषण खालीलप्रमाणे जाणून घेऊया.

नाशकातील मान्सूनचा पॅटर्न बदलला

मान्सूनचा पॅटर्न बदलला असून नाशिकमधील पावसाचा पॅटर्न बदलला आहे. नाशिकमधील अनेक तालुक्यांमध्ये आतापर्यंत ढगफुटी झाली असून त्यात, सिन्नर, इगतपुरी, निफाड, दिंडोरी, नांदगाव अश्याअनेक तालुक्यांमध्ये ढगफुटी झालेली आहे. सिन्नर मध्ये सरासरी १३२ मिमी. पाऊस होतो, आणि काही दिवसांपूर्वी तिथे एका तासामध्ये १६५ मिमी. पाऊस झाला आहे. यावरून हे लक्षात येते की जिल्ह्यात ढगफुटीचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यातील पावसाचा पॅटर्न बदललेला आहे.

काल रात्री झालेला पाऊस वातावरणातील अस्थिरतेमुळे

काल ( दि.०८ गुरुवार ) रात्री झालेला ढगफुटी सदृश पाऊस वातावरणातील अस्थिरतेमुळे झाला आहे. हा पाऊस सरासरी ८७ मिलिमीटर पेक्षा अधिक असून अत्यंत जोरदार असा हा पाऊस होता. काल नाशकातील वातावरणात क्युम्युलोनिम्बस नामक ढग तयार झाले होते. त्यामुळे नाशकात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून, पावसाने इतकी जोरदार बॅटिंग केली होती.

काय आहे क्युम्युलोनिम्बस ढग ?

क्युम्युलो याचा अर्थ ऊर्ध्व दिशेने वाढणारा आणि निम्बस म्हणजे पाणी धारण करणारा, हे ढग वादळाचे निदर्शक आहेत. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. या ढगात गडगडाट होतो, तसेच विजाही चमकतात. वादळी पावसांसह कधीकधी गारपीटही होते. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. जेव्हा ढगातील हवा फार थंड असते, तेव्हा हे थेंब गोठतात व गारा स्वरुपात जमिनीवर येतात. त्या ढगांमुळे मोठ्याप्रमाणावर ढगफुटी होण्याची शक्यता असते.

नाशकातील गटारांची व्यवस्था चुकीची!

नाशिक शहरातील गटारांची व्यवस्था चुकीची असून त्यामुळे काल शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. यामुळे एकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील झाली आहे. त्यामुळे शहरातील गटारांची व्यवस्था प्रशासनाने व्यवस्थितपणे केल्यास अश्या दुर्घटना होणार नाहीत व नागरिकांचीही हाल होणार नाही. काल शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते त्यामुळे मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हा गटार व्यवस्था हा फक्त नाशकातीलच प्रश्न नसून संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे.

आगामी काळात महाराष्ट्राला मोठ्याप्रमाणावर ढगफुटीचा सामना करावा लागणार

नाशिकसह संपूर्ण राज्याला येत्या काळात ढगफुटीचा सामना करावा लागणार आहे असा इशारा अंतरराष्ट्रीय हवामान तज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मान्सूनचा पॅटर्न बदलला असून नाशिकमधील पावसाचा पॅटर्न देखील बदलला आहे. आगामी काळात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच यापेक्षाही भयानक ढगफुटीचा अंदाज आहे.

मान्सून येणे अजून बाकी

२०१९ साली १५ जुलै ला मान्सून चे आगमन झाले. तसेच २०२० साली १५ ऑगस्ट ला मान्सून चे आगमन झाले. २०२१ साली २८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर च्या दरम्यान मान्सून आला. मात्र यंदा मान्सून येणे बाकी असून तो सप्टेंबरच्या शेवटी किवा ओक्टोंबरच्या सुरुवाती पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज प्राध्यापक जोहरे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा हा पाऊस फेब्रुवारी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि याचा परिणाम शेतीवर मोठ्याप्रमाणावर होणार असून कांद्याचे आणि द्राक्षाच्या शेतीला फटका बसणार आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून शेतकर्यांनी छाटणी लांबवी तसेच ती टप्प्या टप्प्याने करावी असे आवाहन प्रा. जोहरे यांनी केले आहे.