अखेर प्रतिक्षा संपली..! बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची बातमी..

By चैतन्य गायकवाड |

पुणे : बारावीच्या निकालाबाबत (12th result) समाजमाध्यमांवर (social media) विविध दावे केले जात असतानाच, आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री (Education Minister) प्रा. वर्षा गायकवाड (Pro. Varsha Gaikwad) यांनी ट्विट (tweet) करून माहिती दिली आहे. त्यांनी स्वतः बारावीच्या निकालाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे आता समाजमाध्यमांवर सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) (ई. १२ वी) परीक्षेचा निकाल उद्या (दि. ८ जून रोजी) दु. १:०० वाजता ऑनलाईन (online) जाहीर होणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे ट्विट..

गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थी तसेच पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात बारावीचा निकाल लागणार, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी अगोदरच दिली होती. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत समाजमाध्यमांवर विविध तारखांचे अंदाज बांधले जात होते. त्यातच आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून अधिकृत माहिती दिली आहे. उद्या दुपारी १ वाजेनंतर मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर (website) हा निकाल बघायला मिळणार आहे.

कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा गेल्या दोन्ही वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच दहावी आणि बारावी दोन्ही वर्गांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. त्या परीक्षांचा निकालही ऑनलाईन जाहीर झाला होता. यावर्षी मात्र कोरोनाची लाट ओसरल्याने रुग्ण संख्या कमी झाली होती. त्यामुळे शासनाने सर्व निर्बंध शिथिल करून व्यवहार सुरळीत चालू केले होते. शाळा, महाविद्यालये देखील नियमित सुरु होते. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षाही ऑफलाईन घेण्यात आल्या होत्या. दोन वर्षांनंतर या परीक्षा ऑफ लाईन घेण्यात आल्या. त्यामुळे उद्या जाहीर होणारा बारावीचा निकाल हा खास ठरणार आहे. या निकालाबाबत विद्यार्थी तसेच पालकांच्या मनात सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे.

या वेबसाईटवर बघा निकाल… विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in यावर भेट द्यावी. तिथे ‘इयत्ता १२ वी निकाल २०२२’ (HSC result 2022) यावर क्लिक करावे. समोर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे विद्यार्थ्यांनी सीट नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा. १२ वीचा निकाल तुमच्या स्क्रीन वर दिसेल.