महत्त्वाची बातमी: अग्निवीरांसाठी वायुसेनेत भरती, असा करा अर्ज.

By चैतन्य गायकवाड

नाशिक : केंद्र सरकारने (Central Government) घोषणा केलेली लष्कर भरतीची नवी ‘अग्निपथ योजना’ (Agnipath Yojna) याद्वारे भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेच्या (Indian Airforce) अग्निपथ योजनेंतर्गत कॉन्स्टेबल आणि इतर पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या पदांसाठी दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असेलेले किंवा व्होकेशनल कोर्स करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे.

या पदांसाठी उमेदवारचा जन्म २९ डिसेंबर १९९९ ते २९ जून २००५ या दरम्यानचा असावा, अशी अट आहे. यानुसार उमेदवाराचे वय १७.५ ते २३ वर्ष असणे आवश्यक आहे. उमेदवाराची उंची कमीतकमी १५२.५ सें.मी., वजन कमीतकमी उंची व वयानुसार आवश्यक असावे, छाती कमीतकमी ५ सें.मी. फुगवता येणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी भारतीय वायुसेनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ५ जुलै २०२२ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. इच्छुक उमेदवारांनी http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी भारतीय वायुसेनेचे अधिकृत संकेतस्थळ http://agnipathvayu.cdac.in किंवा http://indianairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करावा.

काय आहे ‘अग्निपथ योजना’…

‘अग्निपथ’ ही योजना ४ वर्षांच्या सेवेच्या कालावधीसाठी असणार आहे. या योजनेतून भरती झालेल्या तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर, उरलेल्या कालावधीत म्हणजे ३.५ वर्षे हे तरुण सैन्यात कर्तव्य बजावतील. तसेच यात सुरुवातीला ३० हजार रुपये महिना पगार जवानांना मिळणार आहे. त्यानंतर पगार वाढून ४० हजार इतका होईल. मुख्य म्हणजे इतर कायमस्वरूपी सैनिकांप्रमाणे पुरस्कार, पदके आणि विमा संरक्षण देखील या योजनेत मिळणार आहे.

या ४ वर्ष पूर्ण केलेल्या जवानांपैकी केवळ २५ टक्के जववानांनाच कायमस्वरूपी सैन्यात भरती केली जाईल. या जवानांची गुणवत्ता आणि वैद्यकीय तंदुरुस्ती तपासली जाईल आणि यातील २५ टक्के जवानांना पुढे भरती केले जाईल. या योजनेत जे ७५ टक्के जवान बाहेर होतील. या जवानांना सेवा निधी दिला जाईल. हा सेवा निधी १० ते १२ लाख इतका असणार आहे.