नाशकात एकीकडे ढगफुटी अन दुसरीकडे प्यायला पाणी नाही; नागरिकांचा हंडा मोर्चा!

नाशकात एकीकडे ढगफुटी होते आणि दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. अनेक दिवसांपासून हा पाणीप्रश्न गंभीर झाल्याने नागरिक आता आक्रमक झाले असून नाशिक मनपावर नागरिकांचा हंडा मोर्चा काढला आहे. भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु असून, मनपा कधी एकदा खडबडून जागी होते असा सवाल आहे.

गंगापूर धारण तुडुंब भरलेलं!

नाशिकची तहान भागवणारे गंगापूर धारण १०० टक्के भरलेले असून देखील शहरातील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत नसून नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत असून, एन पावसाळ्यात नागरिकांना तहानलेल राहावे लागत आहे. एका बाजूला शहरात ढगफुटी होते, रस्त्यावर गुढग्या एवढे पाणी साचलेले आहे. आणि दुसरीकडे नागरिकांचे घसे मात्र कोरडेच. यावरून पुन्हा एकदा महापालिकेचा भोंगळ कारभार आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

नागरिक आक्रमक

मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी पाणी येत नसून नागरिक आता कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नाशिक मनपावर हंडा मोर्चा काढला आहे. नागरिकांचा सवाल आहे की पाणीप्रश्न कधी सोडवणार, आता तरी मनापा प्रशासनाने जागे व्हावे व नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

नाशकात झाली होती ढगफुटी

नाशकात गुरुवारी ( दि.९ ) रोजी रात्री ढगफुटी झाली होती, सरासरी ९० मिलिमीटर पाऊस झाला असून शहरातील अनेक ठिकाणी तुडुंब असे पाणी भरले होते. रस्त्यावर गुढग्यापर्यंत पाणी साचले होते, आणि शहरात दुसरीकडे अशी परस्परविरोधी परिस्थिती पाहायला मिळत आहे. याला जबाबदार मनपा प्रशासन असून त्यांनी लवकरात लवकर नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवावा.