युवकांकडून गावठी कट्टे, काडतुसे जप्त; देवळाली कॅम्प पोलिसांची कारवाई

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांच्या आदेशाने शहरात धडक कोम्बिंग ऑपरेशन (combing operation) सुरु आहे. या मोहिमेंतर्गत देवळाली कॅम्प पोलिसांनी (Deolali camp police station) धडक कारवाई करत, रात्री १ च्या सुमारास सम्राट हॉटेल जवळ, विजयनगर, देवळाली कॅम्प येथे सहा युवकांना ताब्यात घेतले. या युवकांकडे दोन गावठी कट्ट्यासह तीन काडतुसे आढळून आली. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव (PI Kundan Jadhav) यांना गोपनीय माहिती मिळाली होती. विजयनगर परिसरात पाच-सहा युवक गावठी कट्टा घेऊन येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला होता.

दरम्यान, रात्रीच्या सुमारास सहा संशियत युवक या परिसरात आले. या युवकांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे २ गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे तसेच ५३ हजार रुपये रक्कम आढळून आली. याप्रकरणी प्रशांत नानासाहेब जाधव (वय २५, रा. देवळाली गाव), आतिश कैलास निकम (वय २५, रा. रोकडोबा वाडी, देवळाली गाव), सागर किसन कोकने ( वय २४, रा. चेहडी पंपिंग स्टेशन), रोहन संजय माने (वय २१, रा. गायकवाड मळा), रेहमान जाफर शेख (वय २२, रा. राजवाडा, देवळाली गाव) व गौरव बाबासाहेब फडोळ (वय २२, रा. सुभाष रोड, नाशिक रोड) या सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या युवकांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ- २ चे पोलिस उपायुक्त विजय खरात (DCP Vijay Kharat) यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव, राहुल मोरे, प्रकाश गिते, संदेश पाडवी, लियाकत पठाण, वैशाली मुकणे, बाळकृष्ण गांगुर्डे, सुनील जगदाळे, भाऊसाहेब ठाकरे, श्याम कोटमे, सुभाष जाधव, चंद्रभान भोईर, एकनाथ बागुल, नितीन करवंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, गेल्या महिनाभरात नाशिक शहरात खुनाच्या घटना घडल्या. या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशाने पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत कोम्बिंग ऑपरेशन, पायी गस्त घालणे, गुन्हेगारांची चौकशी करणे, टवाळखोर कारवाई, हत्यार प्रतिबंधक कारवाई, तडीपार तपासणी कारवाई करण्यात येत आहे.