वाद मिटवणे तरुणाच्या अंगलट; डोक्यात दगड टाकत..

नाशिक : हॉटेलमधील वाद मिटवल्याने टोळक्याने एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या अशोका मार्ग भागात घडली आहे. या घटनेत तरुणाच्या डोक्यात दगड टाकत त्याच्या मानेवर धारदार शस्राने वार करण्यात आले आहेत. तरी याप्रकरणी चार जणांच्या टोळक्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांनी २ संशयित हल्लेखोरांना अटक देखील केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांचे साथीदार अद्याप फरार आहे याप्रकरणी जखमी युवकाच्या दिलेल्या तक्रारी वरून मुंबई नका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तक्रारदार जखमी युवक हा रात्री अशोका मार्ग भागात गेला होता. तो त्याच्या मित्रांसोबत हॉटेल जवळ उभा असताना हा हल्ला झाला. संशयित हल्लेखोरांनी त्याच्याजवळ जात हुज्जत घातली, त्याला शिवीगाळ देखील केली. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि अखेर गुन्हेगारीचा कळस गाठत संशयित हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याला जखमी केलं, धारदार शस्त्र वापरत त्याच्या मानेवर वार केले.

नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये ही अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिनधास्तपणे शस्त्रास्त्रांचा वापर शहरात होताना दिसत आहे. दरम्यान केवळ हॉटेलमधील वाद मिटवणं या युवकाच्या अंगलट आले आहे. जखमी तरुण थोडक्यात वाचवला असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फरार संशयतांचा मुंबई नाका पोलीस शोध घेत असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

नाशिकमध्ये काल एका रुग्णालयात झालेला असाच एक हल्ल्याचा प्रकार देखील धक्कादायक होता. किरकोळ वादाचा राग मनात धरून वार्डबॉय ने डॉक्टर वर कैचीने सपासप वार केले होते. किरकोळ कारणांवरून जीव घेण्याइतपत मजल जात आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भीतीखाली जगात आहे. या गुन्हेगारी घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला आळा घालण्याचे आवाहन आता पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.