मविआमध्ये जुंपली! नाना पटोलेंनी घेतला संजय राऊतांचा समाचार..

राज्यात सध्या मविआच्या घटक पक्षांमध्येच जुंपली असल्याचे चित्र आहे. मी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळलं नसतं असं म्हणता तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी संजय राऊत यांना केला आहे. मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं, अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते माझ्या शक्तीचा परिचय करून देत आहेत असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं नसते, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यानंतर अनेक मविआच्या नेत्यांनी याला दुजोरा देत नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळेच मविआ सरकार कोसळल्याचे स्पष्ट केले. त्यातून एकूणच नाना पटोले यांना मनमानी कारभार केल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. त्यावर आता नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

नाना पटोले म्हणाले, मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं. मी राहिलो असतो तर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं. अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते माझ्या शक्तीचा परिचय करून देत आहे. त्यांनी माझ्या शक्तीचा देशाला परिचय करून दिला आहे असे नाना पटोले उपहासात्मकपणे बोलले आहेत.

पुढे ते म्हणाले, पण ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचं नेतृत्व कमी पडत होतं का? असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

पुढे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पद का सोडले याचे कारण सांगितले असून ते म्हणाले, मला विधानसभा अध्यक्ष पद देण्याचा निर्णय हा सोनिया गांधी यांचा होता. मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही सोनिया गांधी यांचाच होता. पक्षाचा आदेश पाळणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम होतं. हायकमांडच्या निर्णयावर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर ते योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.