किशोरी पेडणेकर रामदास कदमांना म्हणतात.. ‘तुमच्या बापाचं..’!

दापोलीत सभेत रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर वैयक्तिक पातळीवर अत्यंत बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेना संतप्त झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरही चांगल्याच आक्रमक झाल्या. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे असं म्हणत बरं झालं ही घाण आमच्या पक्षातून निघून गेली असं वक्तव्य रामदास कदम यांना उद्देशून किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

‘बाळासाहेबांनी विश्वास टाकला आणि यांच्या मुलाला आमदार केलंत. बाळासाहेब ऐकत नव्हते तर वहिनींकडे जाऊन मस्का मारायचे. पण आज किचनपर्यंत जाण्याची यांची जीभ सैल सुटली. एवढा लाळघोटेपणा करणारा नेता गेला.. बरं झालं घाण गेली. राज्यपालांकडील १२ आमदारांमध्ये आमदारकी मिळावी, म्हणून रामदास कदमांचे हे प्रयत्न सुरु आहेत. एवढं वाटत होतं तर तुमच्या मुलाला आमदार का बनवलंत? तुमच्या बापाचं नाव तुम्हीच लावताय नं..मग आम्ही तुमच्या आईला तुमच्या बापाचं नाव विचारायला जायचं का?’, असा संतप्त सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

काय म्हणाले होते रामदास कदम?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.

उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का? मग तुम्हाला हे वारंवार का सांगावे लागत आहे. तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्व आहे की नाही असा सवाल रामदास कदम यांनी केला होता.