कोटबेल: बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरसह 2 जण ताब्यात

मिळालेल्या माहिती नुसार उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह इतर कर्मचारी गस्तीवर असतांना बागलाण तालुक्यातील कोटबेल शिवारातील नाल्यातून विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व २ संशयितांस ताब्यात घेण्यात आले आहे.

सद्या बागलाण तालुक्यातील पोलिस गस्तीवर सज्ज होताच रात्रीतून सुरू असलेल्या अवैध व्यावसायिकांचे चांगलीच धावपळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सविस्तर बातमी : बागलाण तालुक्यातील कोटबेल गाव व परिसरात उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह पोलिस पथकातील हवालदार दौलत गायकवाड, सतिष पवार, राकेश काळे आदि रात्रीतून गस्तीवर असताना येथील शिवारातील नाल्यातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची गुप्त खबरीकडून माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेत एका ट्रॅक्टर ट्रालीमधून विनापरवाना वाळूची चोरी करताना २ जण आढळून आले.

पोलिसांनी आज सायंकाळी गावानजीक असलेल्या स्मशानभूमीजवळील रस्त्यावर सदर वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्राॅलीबाबत विचारणा केली असता सुरूवातीला चालक उडवाउडवीची उत्तर देत होता.

पोलिसांकडून दिपक शंकर केदारे यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन क्रमांक (एमएच ४१,डी९३२५) व त्याला जोडलेली १ ट्राॅली क्रमांक(एमएच ४१,एक्स ०३०९) यामधून एक ब्रास विना परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने त्याला ट्रॅक्टर ट्रॉली कुणाची आहे, याबाबत विचारणा केली असता, सदर ट्रॅक्टर ट्रॉली ही अमर मुका पवार, रा. कोटबेल, ता.सटाणा यांचे असल्याचे सांगून तो त्या ट्रॅक्टर वर चालक असल्याचे सांगितले.

त्यामुळे वाळू हे गौणखनिज वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी सदर ट्रॅक्टर ट्रॉली तीचेतील वाळू या गौण खनिजासह सुमारे ४,७५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला व दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध जायखेडा पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.