‘भूमाफीयांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या’, आदिवासी विकास परिषदेचा आरोप

नाशिक : अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली कडे भूमाफीयांनी आदिवासींच्या जमिनी बळकावून खोटे खरेदी करून स्वताच्या नावावर केल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकासचे लकी जाधव यांनी केला आहे. अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली कडे भूमाफीयांनी आदिवासींच्या जमिनी बळकावून खोटे खरेदी करून स्वताच्या नावावर केल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकासचे लकी जाधव यांनी केला आहे. दरम्यान यासंबंधी अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

मौजे शिरपूर ता शिरपूर जि धुळे (महाराष्ट्र) या तालुक्यात बहुसंख्य जवळ जवळ ७५ टक्के लोक हे आदिवासी शेतकरी व शेतमजुर असून, शिरपूर तालुक्यात ७५ टक्के जमीनी अविभाज्य शर्तीच्या म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम-३६ खालच्या भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी असून, सदर जमिनी ह्या धनदांडग्या लोकांनी आदिवासी जनतेच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन बनावट अंगठे घेऊन व कोणतीही पूर्व कल्पना त्यांना न देता परस्पर खरेदी करून घेतलेल्या आहेत. असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बर्‍याचशा आदिवासी लोकांना मोलमजुरी करून आपल्या उपजीविका भागवाव्या लागत आहेत. वास्तविक पाहता भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी ह्या सक्षम अधिकार्‍यांचे परवानगीशिवाय हस्तांतरित होत नाहीत, असे असताना कोणत्याही हस्तांतरणाच्या परवानगी न घेता परस्पर नावावर करून घेतलेल्या आहेत. असे देखील आरोपात म्हंटले आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आरोप

‘आदिवासींना फसविण्याचे उद्देशाने बनावट दस्ताऐवज तयार करून खोटे खरेदीखत एकमेकांनी करून घेतलेले आहेत. वास्तविक पाहता सदर जमिनी व्यतिरिक्त आदिवासींकडे दुसरी पर्यायी जमीन कसण्यासाठी नसतांना त्यांना भूमिहीन करून सदरची जमीन ही बिगर आदिवासींनी विकत घेतल्याचे बनावट दस्तावेज वरुण दिसून येते. हा व्यवहार हा अत्यंत बेकायदेशीर असून याची सविस्तर चौकशी होऊन पूर्वीचे बेकायदेशीर झालेले व्यवहार रद्द करण्यात येऊन आदिवासी जमातीच्या मूळ मालकांना शेत जमीन परत करण्याबाबत आदेश व्हावेत. तसेच संपूर्ण तालुक्यात झालेल्या आदिवासींच्या जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहारा संबंधि चौकशी होऊन मूळ आदिवासी मालकांना त्यांच्या जमिनी परत करण्याबाबत संबंधित महसुल अधिकारी विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी धुळे,अप्पर जिल्हाधिकारी धुळे, तहसीलदार शिरपूर यांना आदेश व्हावेत. गरीब आदिवासींची फसवणूक केल्याप्रकरणी अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा’ या संदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष बबलूभाऊ मोरे उपस्थित होते