चोरट्यांना पळता भुई थोडी; पोलिसांच्या धाकाने माल सोडून झाले फरार

नाशिक : काही दिवसांपूर्वी पेठरोड शरदचंद्र पवार बाजार समिती बाहेरून औषध आणि तुपाचे डबे चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. औषध आणि दीडशे किलो तुपाचे डबे असा एकूण पावणे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी तपास करत हा मुद्देमाल धुळ्यातून जप्त केला आहे.

मागच्या आठवड्यात ही घटना घडली होती. शरदचंद्र पवार मार्केट यार्ड पेठरोड येथे गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या एका आयशर ट्रक मधून तुपाचे डबे आणि औषध औषधाचे बॉक्स चोरीला गेले होते. एकूण चार लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. मालकाने या चोरीबाबत आयशर चालकावर संशय व्यक्त करत त्याच्या विरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून पोलीस या संशयित चोरट्याच्या मागावर होते. पोलीस मागावर असल्याचा सुगावा चोरट्याना लागल्याने त्यांनी पळ काढत धुळे गाठले होते.

चोरट्यांनी धुळे गाठले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता. पोलिसांनी तत्काळ धुळे येथे जात शोध सुरु केला. तेव्हा तिथे देखील चोरट्यांना पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी मुद्देमाल आहे तसा टाकून त्या ठिकाणहून देखील पळ काढला. या गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना चोरी गेलेला माल आयशर ट्रक चालक हितेश नानाजीभाई पटेल यांनी धुळे जिल्ह्यातील त्याच्या साथीदार विशाल वाघ यांच्या मदतीने चोरी केली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हा माल विक्रीसाठी धुळे येथे ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पंचवटी गुन्हे शोध पथकाने धुळे येथे जाऊन शोध घेतला. पोलीसआपल्या मागावर असल्याचे कळताच आरोपी फरार झाले असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी संशयितांनी चोरी केलेल्या मालापैकी गीर कंपनीचे तुपाचे डबे, मेडिसिन बॉक्स, सायकल पार्सेचे बंडल, धूप बॉक्स, सायकल ट्यूब बॉक्स, हार्डवेअर सामानाचे बॉक्स असा एकूण ४ लाख ४६ हजार ७८८ रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी आयशर ट्रक चालक हितेश नानजीभाई पटेल आणि त्याचा साथीदार विशाल वाघ हे दोघे पोलिसांच्या हाती लागले नसून पंचवटी शोध पोलीस गुन्हे शोध पथक त्यांच्या मागावर आहे.

ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सह पोलीस उपनिरीक्षक विलास पडळकर, अशोक काकड, सागर कुलकर्णी, दीपक नाईल, अनिल गुंबाडे, कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, निलेश भोईर, राकेश शिंदे, गोरक्ष साबळे, घनश्याम महाले, श्रीकांत साळवे, नितीन पवार, अविनाश थेटे, कुणाल पचलोरे, वैभव परदेशी, कल्पेश जाधव, अंकुश काळे, नारायण गवळी, गणेश शिकारे, कैलास सोनवणे यांनी केली आहे.