महाराष्ट्र आले पण बिहार गेले ! भाजपला मोठा धक्का

आज राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला असला आणि भाजपची राज्यात पकड आणखी मजबूत झाली असली तरी बिहार मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला असून यातून त्यांनी भाजपची साथ सोडल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यानंतर आता ते राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत.

आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या चर्चेनंतर दिला राजीनामा दिला असे नितीशकुमार यांनी सांगितले राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले, “आपण एनडीए सोडायला हवी यावर जनता दलाच्या (युनायटेड) सर्व खासदार आणि आमदारांचे एकमत झाले आहे. त्यानंतर लगेचच मी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.”

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार हे राजदच्या नेत्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. याठिकाणी बैठकीनंतर राजदसोबत नवे सरकार स्थापण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन नितीशकुमार यांनी १६० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सोपवून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेस आमदार अजित शर्मा यांनी सांगितले की, महाआघाडीने नितीशकुमार यांना नेता मानले आहे. ते आधी राजीनामा देतील आणि त्यानंतर महाआघाडीसोबत त्यांची बैठक होईल.

बिहारमध्ये जेडीयू, राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून सरकार स्थापन करतील. यानुसार नितीश कुमार यांना आरजेडीचे ७९, जेडीयूचे ४५, काँग्रेसचे १९, डावे १६ तर अपक्ष एक आमदार मिळून १६० जणांचा पाठिंबा असणार आहे.