नाशकात मराठी भाषा गौरव दिनाचा थाट; दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : कवि श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या निमित्ताने नाशिक मध्ये देखील आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सकाळच्या सुमारास ग्रंथ दिंडी काढण्यात आली. शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये लेझीम पथकासह हातात मराठी भाषे संदर्भातील फलक झळकवत उत्साहात सहभाग नोंदवला.

मराठी भाषा गौरव दिन विशेष..महत्व..इतिहास

प्रसिद्ध मराठी कवी वि. वा. शिरवाडकर ज्यांना कुसुमाग्रज नावाने ओळखले जाते, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी राज्यभर ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि मानवतावादी होते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि गरिबीसारख्या सामाजिक दुष्कृत्यांबद्दल बरेच लिखाण केले आहे. त्यांनी सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या आहे. मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

१९९९ मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही सुरू करण्यात आले.

त्याच प्रमाणे नाशिकमध्ये देखील ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नाशिकमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सकाळच्या सुमारास ग्रंथ दिंडी काढण्यात आली. शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये लेझीम पथकासह हातात मराठी भाषे संदर्भातील फलक झळकवत उत्साहात सहभाग नोंदवला आहे. दरम्यान दिवसभर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे.

समाज माध्यमांवर देखील मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. यानिमित्त विविध पोस्ट टाकून शुभेच्छा दिल्या जात आहे. मराठी कवितांच्या ओळी या पोस्टला कॅप्शन म्हणून दिल्या जात आहे. त्यात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी‘, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टीळा‘, ‘माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी’ इत्यादी अनेक जुन्या आणि प्रसिध्द मराठी कवितांच्या ओळींचे कॅप्शन पाहायला मिळत आहे. तर अनेक वेगवेगळे मिम देखील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्हायरल होत आहे.