प्रेयसीला भेटणं जीवावर बेतलं; युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : प्रेयसीला भेटायला जाणं प्रियकराच्या जीवावर बेतलं आहे. ते म्हणतात ना ‘ये इश्क नही आसान,’ तशीच काही घटना नाशिकमध्ये घडली आहे. प्रेयसीला तिच्या नवऱ्याशी लपून भेटायला गेलेल्या प्रियकराला बाल्कनीतून उडी खाणं महागात पडलं. प्रियकराने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून भीतीपोटी उडी खाल्ली आणि यात त्याचा मृत्यू झाला.

खरंतर आज पर्यंत प्रेमात जीव दिला किंवा जीव घेतला अशा अनेक घटना आपण बघितल्याच असतील. अशीच काहीशी आहे नाशिकमधील ही घटना. हिरावाडीत राहणारा एक ३६ वर्षीय युवकाचे म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. हा युवक आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. मात्र त्याचवेळी तिच्या पतीने दोघांना बघितलं. अशात आता आपलं भांड फुटणार अशी भीती प्रियकराच्या मनात निर्माण झाली आणि त्याने भीतीपोटी थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे थेट तिसऱ्या मजल्यावरून मारलेली उडी त्याची शेवटची उडी ठरली. तर याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रेम जेवढं साधं, सरळ, सोप्प अगदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मनाला आनंद देऊन जाणार असतं तसंच त्याचा असा शेवट झालेले ही अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. प्रेमासाठी कुटुंबीयांचा विरोध असणं, पळून जाऊन लग्न करणं आणि पळून गेल्यावर हे कधीकधी ‘सैराट’ प्रमाणे त्या प्रेमाचा अंत होणं, कधी ‘एकमेकांचे नाही होऊ शकलो तर कोणाचेच होणार नाही,’ म्हणून आत्महत्या करणं असे कितीतरी उदाहरण देता येतील आणि त्याच उदाहरणांमध्ये आता नाशिक मध्ये घडलेल्या या घटनेचा देखील उदाहरण असेल.