पुन्हा पाऊस हवामान विभागाचा इशारा; नाशिक जिल्ह्याला अलर्ट जारी

राज्याला पुन्हा मुसळधार सुरु झाली असून पुन्हा एकदा याचा फटका बसायला लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला असून पुढील दोन-तीन दिवस पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात नाशिकला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून मुसळधार होण्याची शक्यता आहे.


परतीचा पाऊस

अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. काल-परवा, नाशिकला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अवघ्या १ तासात ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशकात पुन्हा ठीक-ठिकाणी पाणी साचले होते. आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. त्यात नाशिकला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्टही जाहीर केला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस असणार आहे. तर नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढणार आहे.

मराठवाड्यात होणार जोरदार

हवामान विभागाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर भागात पावसाचा जोर असल्याची हवामान विभागाने माहिती दिली.